कोल्हापूर : ‘भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या आजी-माजी संचालकांकडून साखर कारखान्यामध्ये अनेक घोटाळे झाले आहेत. लेखापरीक्षकांकडून ते लपवण्याचे प्रकार ताळेबंदामध्ये स्पष्ट दिसत आहेत. २०१६-१७ पासून ते आजअखेर ऊस खरेदी व्यवहारांमध्ये ४० कोटींपर्यंतचा गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कारखान्याची कलम ८३ नुसार चौकशी करावी, अशी मागणी जनार्दन पाटील, वसंत पाटील आदी सभासदांनी केली आहे. या मागणीचे लेखी निवेदन कोल्हापूर येथील साखर सहसंचालकांना देण्यात आले. दरम्यान, कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावले. काहीजण सर्वसाधारण सभेच्या तोंडावर स्टंटबाजी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याबाबत सभासदांनी दिलेल्या निवेदनानुसार, कारखाना प्रत्येक वर्षी ३७ ते ४० कोटींपर्यंतचे कर्ज दाखवून या रकमेचा ऊस खरेदी केल्याचा उल्लेख ताळेबंदात करते. ती रक्कम थकीत असल्याचे हेही दाखवले जाते. यातून कारखान्यात गेल्या पाच वर्षांत परस्पर साखर विक्री, ऊस खरेदी व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे. मात्र, याची चौकशी करण्यास साखर संचालकांकडून चालढकल केली जात आहे, असा आरोप करण्यात आला आहे. ताळेबंदात याची नोंद असूनही लेखापरीक्षकांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर वसंत पांडुरंग पाटील, जनार्दन गुंडू पाटील, इस्माईल जमादार व तुकाराम डेळेकर यांच्या सह्या आहेत.