कोल्हापूर : साखर कारखान्यांनी उसाचा दुसरा हप्ता द्यावा या मागणीसाठी आंदोलन अंकुश संघटनेने मोटारसायकल रॅली काढली. सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. दत्त, शरद आणि श्री गुरुदत्त साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांना “आंदोलन अंकुश ” च्या कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅलीने निवेदन दिले. साखर, बगॅस, मळीला चांगला भाव मिळाल्याने साखर कारखान्यांनी गतवर्षी गाळप केलेल्या उसाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना आदा करावा आणि लवकर कारखाने सुरू करावेत, अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली.
‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे म्हणाले, गेल्या वर्षभरात उसापासून मिळालेल्या साखर, बगॅस आणि मळीला चांगला दर मिळाला आहे. यातून साखर कारखान्यांना कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला आहे. यातून शेतकऱ्यांना सप्टेंबर अखेरपर्यंत दुसरा हप्ता देऊन ऊस हंगाम एक ऑक्टोबरपासून सुरू करण्यास हरकत नाही. कारखान्यांना मिळालेल्या नफ्यातील ७० टक्के रक्कम शेतकऱ्यांना द्यावी. आम्ही या मागणीसाठी गुरुदत्त, दत्त, शरद साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांना मोटारसायकल रॅलीने निवेदन दिले आहे. कारखान्यांच्या वार्षिक सभेपूर्वी सभासदांना दुसरा हप्ता किती व केव्हा देणार हे सांगावे. यावेळी दीपक पाटील, राकेश जगदाळे, नागेश कोळी, संभाजी शिंदे, उदय भोगले, प्रमोद बाबर, दत्तात्रय जगदाळे, उद्धव मगदूम, राजू पाटील, महेश जाधव, भूषण गंगावणे आदी उपस्थित होते.