कोल्हापूर : ऊस दरासाठी संघटना आक्रमक, आंदोलन अंकुशने दत्त कारखान्याची वाहतूक रोखली

कोल्हापूर : येथील श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याने एक नोव्हेंबरपासून गळीत हंगाम जोमाने सुरू करण्याकरिता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तोडी दिल्या होत्या. अर्जुनवाड परिसरातील ऊसतोड आंदोलन अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडल्या. तथापि उसाने भरलेली काही वाहने रात्री आठच्या सुमारास छत्रपती शिवाजी चौकामध्ये आली. ही वाहने आंदोलन अंकुश संघटनेच्या कार्यकत्यांनी अडवली. यावेळी कारखाना समर्थक व आंदोलन अंकुश संघटनेचे कार्यकर्ते यांच्यामध्ये झटापट झाली. या घटनेनंतर शिरोळमध्ये रात्री उशीरापर्यंत तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी घालवाड फाटा येथे बंदोबस्त तैनात केला आहे.

दरम्यान, या आंदोलनावेळी धनाजी चुडमुंगे यांसह आंदोलन अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांना कारखाना समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी केला आहे. रात्री उशिरापर्यंत धनाजी चुडमुंगे व कार्यकर्ते यांनी घालवाड फाट्यावर ठिय्या मारला होता. या ठिकाणी शिरोळ पोलिसांनी राखीव पोलिस दलाची कुमक मागवली. कारखाना समर्थक कार्यकत्यांनी वाहने अडवायची नाहीत, अशी भूमिका घेतल्याने आंदोलन तीव्र झाले. ‘आंदोलन अंकुश’चे कार्यकर्ते व कारखाना समर्थकांमध्ये ढकलाढकली झाली. या घटनेमुळे वातावरण तणावपूर्ण बनले. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कुडित्रे येथे सलग दुसऱ्या दिवशी दालमिया कारखान्याच्या ऊस तोडी रोखल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कुंभी परिसर कार्यकर्त्यांनी दुसऱ्या दिवशीही पुन्हा ऊस वाहतूक रोखून धरली. यावेळी दालमिया कारखान्याच्या शेती विभागाच्या अधिकाऱ्यांनी, उद्या दर जाहीर करू. यानंतरच ऊस तोडी देऊ असे सांगितल्यानंतर वाहने सोडण्यात आली. बाजीराव देवाळकर, बाजीराव पाटील, रंगराव पाटील, एस. बी. पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here