कोल्हापूर: कोल्हापुरात उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचच्या कामकाजास १८ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे गंगानगर येथील दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत ११ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी कोल्हापूर सर्किट बेंचकडे वर्ग केली आहे. आता सर्किट बेंचपुढे सुनावणी होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सत्ताधारी पी. एम. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सात महिन्यांपूर्वी कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली होती. मात्र, सहकार निवडणूक प्राधिकरणाने त्यास मान्यता दिली नव्हती. याबाबत एप्रिल महिन्यात बाबासाहेब मगदूम व इतर यांनी सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने २३ एप्रिल रोजीच्या निकालामध्ये सुनावणी होईपर्यंत कारखान्यावर प्रशासक नियुक्तीबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेश ३० एप्रिलला प्राधिकरणाला दिले आहेत. त्यामुळे निकाल लागेपर्यंत कारखान्यावर प्रशासक येण्याची शक्यता मावळली आहे. आता न्यायालयाने ही सुनावणी सर्किट बेंचकडे वर्ग केली आहे. त्यामुळे लवकर पुढील सुनावणी होईल अशी अपेक्षा आहे.