कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून गोंधळ उडाल्याने त्याबद्दल सविस्तर माहिती मिळावी, यासाठी या कारखान्याचे सभासद सुकुमार गडगे आणि रमेश चौगुले या दोघांनी माहिती अधिकाराखाली माहिती मागविली होती. परंतु, एक महिना उलटला तरी कारखाना व्यवस्थापनाने यासंदर्भात माहिती दिली नाही. त्याविरोधात जिल्हाधिकारी, साखर संचालक स्तरावर तक्रार करूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी केंद्रीय सहकार लोकपालांकडे तक्रार केली होती. आता लोकपालांनी कारखाना व्यवस्थापनाने १५ दिवसांत माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.
पंचगंगा कारखान्याचे सभासद गडगे आणि चौगुले यांनी निवडणुकीसाठीची उत्पादक आणि अनुत्पादक सभासदांची यादी द्यावी, त्यांनी २०१९ ते २०२४ पर्यंत सभासद, बिगर सभासद यांचा कारखान्याला किती ऊस पुरवठा झाला? तसेच कारखान्याचा २०१० ते २०२३ या कालावधीतील लेखापरीक्षण अहवाल आणि सवलतीच्या साखरेचे वाटप करण्यात आलेल्या सदस्यांची यादी मागितली आहे. ही माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा त्यांचा आक्षेप आहे. या दोघा सभासदांनी याबाबत साखर संचालक, जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागितली. अखेर त्यांनी केंद्रीय सहकार विभागाकडे तक्रार केली. या विभागाने तत्काळ दखल घेत केंद्रीय लोकपाल अग्रवाल यांनी कारखाना व्यवस्थापनास माहिती देण्याबाबत निर्देश दिले. तर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक नंदकुमार भोरे यांनी १५ दिवसांत माहिती दिली जाईल असे सांगितले.