कोल्हापूर : अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना व आसवनीचे आधुनिकीकरण जिल्हा बँकेच्या सहकार्याने युद्धपातळीवर सुरू आहे, तसेच उसाला चांगला दर देण्यासाठी इथेनॉल प्रकल्प उभारण्याचे नियोजन असून येत्या हंगामात कारखाना वेळेत सुरू होईल, अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे यांनी दिली.हरळी येथील कार्यस्थळी कारखान्याच्या मिल रोलर पूजनप्रसंगी ते बोलत होते. पताडे म्हणाले, येत्या हंगामात ५ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून आजअखेर ७ हजार हेक्टर क्षेत्रावरील उसाची कारखान्याकडे नोंद झाली आहे. ऊस बिल, कंत्राटदारांची बिले व कर्मचाऱ्यांचा पगार वेळच्या वेळी देण्याचे नियोजनही केले आहे.
संचालक सतीश पाटील म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याला ऊर्जितावस्था देण्यासाठी संचालक मंडळ एकजुटीने कार्यरत आहे. अपेक्षित गाळप झाल्यास कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नही मार्गी लावले जातील.कार्यकारी संचालक सुनील महिंद यांनी प्रास्ताविक केले. संचालक काशीनाथ कांबळे यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील, संचालक विद्याधर गुरबे, बाळासाहेब देसाई, अशोक मेंडुले, अक्षय पाटील, शिवराज पाटील, भरमू जाधव, शिवशंकर हत्तरकी उपस्थित होते.