कोल्हापूर : राज्य सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी व पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या अंतर्गत जिल्ह्यात एकाच वर्षात दोन वेळा पीक कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार आहे. सहकार विभागाने जिल्ह्यात १२ हजार २८८ शेतकऱ्यांची नावे पाठविली होती, त्यातील निकषानुसार किमान १० हजार शेतकऱ्यांना ४० कोटी रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. येत्या आठवड्यात अंतिम याद्या सहकार विभागाकडे येणार असून, त्यानंतर पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक वर्षानुसार नव्हे तर कारखान्यांकडील बिलाच्या माध्यमातून कर्जाची परतफेड करतात. त्यामुळे एकाच वर्षांत दोन वेळा कर्जाची उचल दिसत असल्याने त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानापासून वंचित रहावे लागले होते. राज्य सरकारने अशा शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार याद्या करून १२ हजार २८८ खातेदारांसाठी ४६ कोटी ७३ लाख रुपयांचे अनुदानाचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सहकार विभागाकडे पाठवला होता. याबाबत जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी सांगितले की, येत्या आठवड्यात मंजुरीची अंतिम यादी प्राप्त होईल, त्यासाठी मंत्रालयस्तरावर पाठपुरावा सुरू आहे.

















