कोल्हापूर : येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर गेल्या पाच दिवसांपासून जय शिवराय किसान संघटना, शरद जोशी संघटनना, शेतकरी सेना, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, आम आदमी पार्टी, बळीराजा, रयत संघटनेकडून सुरू असलेले आंदोलन काल तीव्र झाले. या आंदोलनादरम्यान साखर सहसंचालकांच्या कार्यालयाचे प्रवेशद्वार ढकलून कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर प्रादेशिक उपसंचालक गोपाळ मावळे यांनी संघटनांशी चर्चा केली. १४ दिवसांत एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांना व्याजासह एफआरपी द्यावी लागेल असे यावेळी ठरले. तसेच शुक्रवारी (ता. १४) साखर आयुक्तांसोबत बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. त्यानंतर संघटनांनी ऊस दर आंदोलन मागे घेतले. दरम्यान, रविवारी मध्यरात्री दराचा तोडगा निघाल्यामुळे शिरोळ तालुक्यात आंदोलन अंकुश संघटनेने आंदोलन मागे घेतले. त्यानंतर ठप्प झालेला ऊसतोडीचा हंगाम धुमधडाक्यात सुरू झाला आहे.
यावेळी साखर कारखान्यांचे वजन काटे तपासण्यासाठी त्या-त्या आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्ती केली जाईल, पाळीपत्रकानुसारच ऊस तोडण्या दिल्या पाहिजेत, ऊस तोडणीसाठी पैसे घेतल्याची तक्रार आल्यास संबंधित मुकादमाकडून ही रक्कम वसूल केली जाईल’, असे आदेश मावळे यांनी दिले. याबाबत जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव माने म्हणाले, “जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांनी ३५ कोटी थकवले आहेत. त्यांनी व्याजासह ही रक्कम दिली पाहिजे, यासाठी पंधरावड्याच्या अहवालामध्ये स्वतंत्र व्याजाचा कॉलमही भरून देण्याचे बंधनकारक केले आहे. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष रुपेश पाटील यांनी काटामारी थांबवण्यासाठी तपासणी करण्यात येणाऱ्या भरारी पथकात त्या-त्या आयटी तज्ज्ञांचा समावेश केला जाणार आहे.’ साखर उतारा चोरी थांबविण्याची मागणी प्रा. जालंदर पाटील यांनी केली. यावेळी सावकार मादनाईक, संदीप देसाई, सदाशिव कुलकर्णी भगवान काटे, नितीन पाटील आदी उपस्थित होते.












