कोल्हापूर : दुसरा हप्ता मिळेपर्यंत ऊस तोडणी न करण्याचे आंदोलन अंकुश संघटनेचे आवाहन

कोल्हापूर : उसाच्या दुसऱ्या हप्त्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी आंदोलन अंकुश संघटनेने ऊस पट्ट्यातील प्रमुख गावांत जागर बैठका घेतल्या जात आहेत. यासंदर्भात उदगाव येथील महादेवी मंदिरात बुधवारी (ता. ८) रात्री जागर बैठक झाली. यावेळी संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी साखर कारखान्यांना झालेल्या नफ्यातील वाटा म्हणून शेतकऱ्यांना दुसरा हप्ता दिल्याशिवाय ऊसतोडी घेऊ नका, असे आवाहन केले. सरकारने एफआरपी नियंत्रित करण्याचा आखलेला डाव शेतकऱ्यांनी ओळखायला हवा. एकीकडे कारखाने एफआरपीवर दर द्यायला तयार नाहीत, तर दुसरीकडे सरासरी रिकव्हरी कमी करून आणि तोडणी वाहतुकीचा खर्च वाढवून एफआरपी नियंत्रित करण्याचे षड्यंत्र कारखान्यांनी रचले आहे असा आरोप चुडमुंगे यांनी केला.

यावेळी चुडमुंगे म्हणाले की, गेल्यावर्षी साखर कारखान्यांना साखर आणि उपपदार्थ विकून मोठा नफा झालेला आहे. नफ्यातील वाटा शेतकऱ्यांना त्यांनी स्वतःहून द्यायला पाहिजे होता; पण एफआरपीवर दर द्यायची त्यांची भावना नाही. एफआरपीमध्ये ऊस शेती परवडत नाही ही वस्तुस्थिती आहे. कारखानदारांचे शेतकऱ्यांना लुटायचे धोरण ठरलेले आहे. यावेळी दीपक पाटील, राकेश जगदाळे यांनी आंदोलन करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. हनुमान पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष राजू चौगुले, शीतल जाधव, बिरू पुजारी, सिकंदर सनदी, भगवान घाटगे, बाळगोंड पाटील, संजय मगदूम, प्रकाश पुजारी, पोपट संकपाळ, बंटी माळी, भारत ढाले उपस्थित होते. संभाजी शिंदे यांनी स्वागत केले. कुंभोजकर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here