कोल्हापूर : सहवीज प्रकल्प आणि मशिनरीच्या आधुनिकीकरणामुळे यंदा उशिरा सुरू होणारा कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याचा गळीत हंगाम अखेर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत २६ जानेवारीपासून सुरू करण्यात आला आहे. कारखान्याची अपुरी जागा, जुनी मशिनरी काढून नवीन मशिनरी बसवण्याचे काम तसेच सलग पाच महिने चाललेल्या पावसाळ्यामुळे कारखाना सुरू करणे हे मोठे आव्हान ठरले होते. यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याकडून विनाकपात प्रतिटन ३५०० रुपये ऊस दर दिला जाणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष, आमदार अमल महाडिक यांनी दिली. सर्व सभासदांनी आपला जास्तीत जास्त ऊस कारखान्याला पाठवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सांगितले की, अनेक अडचणींवर मात करत कारखान्याचे आधुनिकीकरण पूर्ण करण्यात आले असून, यंदाच्या हंगामासाठी कारखाना सज्ज झाला आहे. या प्रक्रियेत कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी व वाहतूक कंत्राटदार, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हंगाम जरी उशिरा सुरू झाला असला तरी भविष्यात या आधुनिकीकरणाचा कारखान्याला मोठा फायदा होणार आहे. यंदाच्या हंगामात अन्य साखर कारखान्यांप्रमाणेच ‘राजाराम’ साखर कारखान्याकडूनही प्रतिटन ३५०० रुपये ऊस दर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष गोविंद चौगुले, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
















