कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात ३,६०० प्रतिटन दर द्यावा तसेच मागील थकीत देणी द्यावी, यासाठी ओलम साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी हल्लाबोल आंदोलन सुरू ठेवले. सकाळी ११ वाजता सुरू झालेले आंदोलन रात्री ९ वाजले तरी सुरूच होते. चर्चेसाठी कारखाना व्यवस्थापनाचे अधिकारी आले नाहीत. रात्री उशिरापर्यंत माजी खासदार राजू शेट्टी, कर्नाटकचे माजी मंत्री शशिकांत नाईक, शिवापूर (ता. हुक्केरी) येथील काडसिद्धेश्वर स्वामी, स्वाभिमानीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अजित पोवार, राज्य सचिव राजेंद्र गड्याणावर, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दीपक पाटील, चंदगड तालुकाध्यक्ष जगन्नाथ हुलजी आंदोलनस्थळी ठाण मांडून होते. हुक्केरी आणि बेळगाव तालुक्यातील रयत संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन स्थळी आले.
शेट्टी म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात २१ कारखाने आहेत. यापैकी गडहिंग्लज विभागातील पाच कारखान्यांनी ३,४०० रु. दर जाहीर करून अन्याय केला आहे. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी ३,५०० च्या पुढे दर दिला आहे, मग चंदगड येथील कारखानदार मागे का?, असा सवाल उपस्थित केला. कारखाना स्थळापासून जवळ असणाऱ्या शिवापूर (ता. हुक्केरी) येथील मठाचे काडसिद्धेश्वर स्वामी यांनी शेतकऱ्यांसाठी वजन काटा उभारण्यासाठी जमीन देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर शेट्टी यांनी शेतकऱ्यांना आवाहन करून लोकवर्गणी काढून वजन काटा उभा करू, असे सांगितले.
आंदोलनात बाळाराम फडके, ए. बी. रेडेकर, नरसिंग बाचुळकर, स्वस्तिक पाटील, विक्रम पाटील, पुरंदर पाटील, अशोक पाटील, राजू पाटील, बसवराज मुतनाळे, तानाजी देसाई, रयत संघटनेचे कर्नाटक राज्याध्यक्ष जीयाउल्ला वंटमोरी, गोपाळ मारबसवनावर, शांतिनाथ मगदूम, संजय हवनावर, परशुराम पाटील सहभागी झाले आहेत.


















