कोल्हापूर : नरंदे (ता. हातकणंगले) शरद सहकारी साखर कारखान्यातून बाहेर पडणारे प्रदूषित पाणी भेंडवडेकडे जाणाऱ्या ओढ्यात सोडले जात होते. हे प्रदूषित पाणी जमिनीत मुरल्याने विहिरी व कूपनलिकांचे पाणीही दूषित होऊ लागले. त्यामुळे संतप्त झालेले भेंडवडे ग्रामस्थांनी कारखान्यावर मोर्चा काढला. सकाळी दहाच्या सुमारास भेंडवडे गावातील शेकडो ग्रामस्थ व पंचायत सदस्य कारखाना स्थळी वजन काट्याजवळ दाखल झाले. दूषित पाणी बंद होईपर्यंत कारखाना बंद करण्यात यावा व प्रदूषण विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवावे, अशी मागणी केली. कारखाना प्रशासनाच्या विरोधात निषेध नोंदवत घोषणाबाजी केली. संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरले, प्रशासन आणि ग्रामस्थांत चर्चेवेळी जोरात वादावादी झाली.
घटनास्थळी आलेले पोलिस उपाधीक्षक अमोल ठाकूर, तहसीलदार सुशील बेल्हेकर व प्रदूषण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील यांना ग्रामस्थांनी जाब विचारला. त्यानंतर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. आवटी घटनास्थळी आले. त्यांनी ग्रामस्थांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ग्रामस्थांची त्यांच्यासोबत खडाजंगी झाली. आंदोलनकर्त्यांनी कारखान्यात जाणारी ऊस वाहने रोखली व कारखाना बंद करण्याची मागणी केली. परिस्थिती पाहून कारखाना प्रशासनाने ऊस घेऊन येणारी वाहने बाहेरच थांबवली. प्रशासनाने उपाय योजनांचे आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली. प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर भेंडवडे ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले. आंदोलनात भेंडवडे गावचे व वारणा कारखान्याचे संचालक काकासाहेब चव्हाण, विजय अपराध, सुहास देसाई, शशिकांत माने, डॉ. संजय देसाई, हणमंत पोवार, अमोल निकम, नयुम पठाण, विनोद चव्हाण, विनोद देसाई, महावीर कांबळे, विजय माने, हणमंत पाटील, शांतिनाथ देसाई आदी सहभागी झाले होते.

















