कोल्हापूर: सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने चालू गाळप हंगामातील एकूण गाळपापैकी आजअखेर ५,६३,७०५ मेट्रिक टनाची १९१ कोटी ६६ लाखांची बिले शेतकऱ्यांना अदा केली आहेत. कारखान्याच्यावतीने चालू गळीत हंगामाच्या १६ ते ३१ जानेवारी या पंधरवड्यातील ७५ हजार २३५ टन उसाची प्रतिटनाला ३,४०० रुपयांप्रमाणे होणारी २५ कोटी ५८ लाख रुपयांची ऊस बिले जमा करण्यात आली आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी दिली. कारखान्याने हंगाम समाप्तीपर्यंत एकूण ६,०२,६९८ इतक्या मेट्रिक टन उसाचे गाळप करून सरासरी १२.४० टक्के साखर उताऱ्यासह ६,७०,६५५ क्विंटल साखर उत्पादित केली आहे, असेही त्यांनी सांगितले.
याबाबत अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितले की, कारखान्यातर्फे एक फेब्रुवारी २०२६ पासून ते हंगाम समाप्तीपर्यंतची ऊस बिले व हंगाम उर्वरित समाप्तीपर्यंतची तोडणी वाहतूक बिले लवकरच अदा केली जाणार आहेत. कारखान्याने चालू हंगामात को जन प्रकल्पात साडेसहा कोटी युनिट्स वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. आजअखेर सहा कोटी ११ लाख युनिट्स वीजनिर्मिती करून चार कोटी ३२ लाख युनिट्स वीज महावितरण कंपनीला निर्यात केली आहे. कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पाचे दोन कोटी लिटर्स स्पिरिट व इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट आहे. आजअखेर एक कोटी आठ लाख लिटर्स स्पिरिट व इथेनॉल निर्मिती झाली आहे. त्यापैकी ५५ लाख लिटर्स इतके इथेनॉल व स्पिरिट पुरवठा केला आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी झालेल्या तोडग्यानुसार प्रतिटनाला १०० रुपये लवकरच दिले जाणार आहेत.


















