कोल्हापूर : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने चालू गळीत हंगामाच्या १६ जानेवारी ते ३१ जानेवारी या पंधरवड्यातील ७५,२३५ टन उसाची बिले जमा केली आहेत. प्रति टन ३४०० रुपयेप्रमाणे होणारी २५ कोटी ५८ लाख रुपयांची ऊस बिले जमा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी दिली.
ते म्हणाले, तोडणी वाहतूक बिलेही अदा केली आहेत. एक फेब्रुवारी २०२६ पासून ते हंगाम समाप्तीपर्यंतची ऊस बिले व हंगाम समाप्तीपर्यंतची उर्वरित तोडणी-वाहतूक बिले लवकरच अदा केली जाणार आहेत. दरम्यान, हा हंगाम सुरू होण्यापूर्वी झालेल्या तोडग्यानुसार प्रतिटनाला १०० रुपये लवकरच दिले जाणार आहेत. असे प्रतिटनाला एकूण ३,५०० रुपये ऊस बिल दिले जाणार आहे. शेतकऱ्यांनी व वाहतूक कंत्राटदारांनी आपापल्या संबंधित बँकेशी संपर्क साधावा.
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने चालू गाळप हंगामातील एकूण गाळपापैकी आजअखेर ५,६३,७०५ मेट्रिक टनाची १९१ कोटी ६६ लाखांची बिले शेतकऱ्यांना अदा केली आहेत. चालू हंगामात को-जन प्रकल्पात साडेसहा कोटी युनिट्स वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. आजअखेर सहा कोटी ११ लाख युनिट्स इतकी वीजनिर्मिती करून चार कोटी ३२ लाख युनिट्स वीज महावितरण कंपनीला निर्यात केली आहे.
कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पाचे एकूण दोन कोटी लिटर्स स्पिरिट व इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट आहे. आजअखेर एक कोटी आठ लाख लिटर्स स्पिरिट व इथेनॉल निर्मिती झाली आहे. त्यापैकी ५५ लाख लिटर्स इतके इथेनॉल व स्पिरिट पुरवठा केला आहे. ६,७०,६५५ क्विंटल साखर उत्पादितहंगाम समाप्तीपर्यंत कारखान्याने एकूण ६,०२,६९८ इतक्या मेट्रिक टन उसाचे गाळप करून सरासरी १२.४० टक्के साखर उताऱ्यासह ६,७०,६५५ क्विंटल साखर उत्पादित केली आहे.


















