कोल्हापूर : योग्य नियोजन व सभासद शेतकऱ्यांचे पाठबळ या जोरावर चालू गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ‘शाहू’ची यंत्रणा सज्ज आहे, असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले. येथे शाहू साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन व गळीत हंगाम प्रारंभ अशा संयुक्त कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ समरजित घाटगे व त्यांच्या पत्नी सौ. नवोदिता घाटगे यांच्या हस्ते व आर्यवीर घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिवत संपन्न झाला. त्यांच्यासह संचालकांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा विधिवत शुभारंभ झाला. घाटगे पुढे म्हणाले, कारखान्यास गाळप क्षमतेइतका दैनंदिन ऊसपुरवठा करण्यास पुरेशा तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार केले आहेत. कर्नाटकसह आसपासच्या कारखान्यांचा अंदाज घेऊन पंधरा ऑक्टोबरदरम्यान गळीत हंगाम सुरू करण्यासाठी ‘शाहू’ची सर्व तयारी झाली आहे.
समरजित घाटगे म्हणाले कि, स्व. राजेसाहेब नेहमी म्हणत असत, सहकारी साखर कारखाने हे शेतकऱ्यांच्या मालकीचे आहेत. मात्र काही सभासद शेत लवकर रिकामे व्हावे म्हणून बाहेरील कारखान्यांना ऊस देतात. त्यामुळे कारखान्याच्या गाळपावर परिणाम होतो. अकरा लाख मे. टन ऊस गाळपाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी इतर विल्हेवाट न करता पिकवलेला संपूर्ण ऊस कारखान्याकडे गळितास पाठवावा, असे आवाहन घाटगे यांनी केले. कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांचे भाषण झाले.