कोल्हापूर : शंकरराव पाटील-कौलवकरांचा साखर कामगार ते जिल्हा परिषद अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास आजही प्रेरणादायी

कोल्हापूर : राज्यात सध्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही निवडणूक प्रक्रिया गतीने सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या राजकारणाकडे पाहिले असता या क्षेत्रातला एक विक्रम अद्याप दिवंगत शंकरराव बाळा पाटील-कौलवकर यांच्या नावावर अबाधित असल्याचे दिसते. भोगावती सहकारी साखर कारखान्यात शिपाईपदापासून वाटचाल सुरू केलेल्या कौलवकर यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाला गवसणी घातली. ते जिल्हा परिषदेचे सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिले. १८ जुलै १९८० ते ६ एप्रिल १९८३ आणि ४ एप्रिल १९८६ ते ३० जून १९९० या काळात त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले होते. पाटगाव, काळम्मावाडी धरणांसाठी आंदोलन करणाऱ्या कै. पाटील यांनी जिल्हा परिषदेत जाऊन चांगले काम करता येते याचा वस्तुपाठ घालून दिला आहे.

पाटील यांचा जन्म गरीब शेतकरी कुटुंबात झाला. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेताना ते भोगावती कारखान्यात शिपाई म्हणून नोकरीला लागले. पण, त्यांना शिक्षक होण्याची महत्त्वकांक्षा होती. ते पुढील शिक्षणासाठी कोल्हापुरात आले. महाविद्यालयाच्या विद्यापीठ प्रतिनिधीपदाच्या निवडणुकीने त्यांना राजकारणाची गोडी लागली. त्यांनी कायद्याची पदवी घेऊन काही काळ वकिली केली. नंतर १९७९ ला पहिल्यांदा त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले. नेतृत्व गुणामुळे १९८० ला ते पहिल्यांदा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. तीन वर्षांच्या पहिल्या टर्मममधील अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी शिक्षक भरतीसह विविध कामांवर लक्ष दिले. त्यांना पुन्हा १९८६ ते १९९० अशी चार वर्षे अध्यक्ष पदावर कामाची संधी मिळाली. त्यांचा हा विक्रम आजही अबाधित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here