कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील ऊस पिकावर लोकरी मावा व तांबेरा रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यंदा सलग चार महिने पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्याने उसाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. त्यात लोकरी माव्याचा आणि तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उसाची वाढ खुंटणार आहे, तर तांबेरा रोगामुळे पाने गळून पडतात. त्यामुळे उसाचे वजन आणि साखर टक्केवारीवर विपरित परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. वातावरणातील आर्द्रता व बदलत्या हवामानामुळे रोगाला पोषक वातावरण मिळत असल्याने ऊस पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भुदरगड तालुक्यात दरवर्षी पाच ते साडेपाच लाख मेट्रिक टन उसाचे उत्पादन होते. यंदा ८,७२० हेक्टर जमिनीवर उसाची लागवड केली आहे. मजूर, औषधे आणि रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती आणि आता आलेल्या लोकरी मावा आणि तांबोरा रोगामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणार आहेत. पिकावर आधीच विविध कीड आणि रोगांचा ताण वाढलेला असताना आता लोकरी मावा, तांबेरा दिसू लागल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे असे प्रगतिशील शेतकरी कृष्णा जरग यांनी सांगितले. तर तालुका कृषी अधिकारी महादेव खुडे यांनी शेतकऱ्यांनी रोगनियंत्रक औषधांची फवारणी करावी असे आवाहन केले आहे.