कोल्हापूर : सध्याचे ढगाळ आणि दमट हवामान यामुळे तालुक्यातील ऊस पिकावर अनेक ठिकाणी लोकरी मावा किडीचा फैलाव झाला आहे. त्यामुळे पिकाची वाढ खुंटली आहे. लोकरी माव्याचा सर्वाधिक प्रादुर्भाव तालुक्यातील अडकूर परिसरात झाला आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी कृषी विभाग आणि साखर कारखान्यांनी लक्ष घालावे,अशी मागणी शेतकरी करत आहेत. कृषी विभाग, पंचायत समिती कृषी विभाग आणि परिसरातील साखर कारखान्यांचे शेती विभाग कार्यरत असूनही योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
सद्यस्थितीत आठवडाभरापासून सतत रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. उसावर पांढऱ्या रंगाच्या लोकरीसारख्या किडी पसरल्या आहेत. ही किड पानांमधील रस शोषून घेत असल्यामुळे पाने पिवळी, काळसर पडत आहेत. सध्याचे वातावरण किडीच्या वाढीसाठी पोषक ठरत असल्याने फैलाव वेगाने होत आहे. मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक उघडीप मिळाली नाही. परिणामी उसाची वाढ खुंटली असून वजनात घट होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी कीटकनाशक फवारणी करणेही अवघड बनले आहे..