कोल्हापूर : भोगावती सहकारी साखर कारखान्याला सावरण्यासाठी सर्वपक्षीय विचारांतून मार्ग काढावा लागेल. त्यासाठी सर्वांनी एकसंध राहूया, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी केले. साखर कारखान्याच्या ६९ व्या सर्वसाधारण सभेमध्ये ते बोलत होते. साखर उद्योग सावरण्यासाठी, साखर कारखान्यांसह ऊस उत्पादक सभासदांना चांगले दिवस येण्यासाठी साखरेला प्रति क्विंटल किमान पाच हजार रुपये दर मिळाला यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने प्रयत्न करावेत, असा ठराव सभेत करण्यात आला. वार्षिक सभेतील चर्चेत सभासदांनी विविध प्रश्न उपस्थित केले. जनार्दन पाटील यांनी सरकारकडून मिळणाऱ्या ११४ कोटी रुपयांतील शेतकऱ्यांचे २०० रुपये याप्रणामे ८ कोटी द्यावेत, अशी मागणी केली.
यावेळी अध्यक्ष पाटील यांनी १३२ रुपये एफआरपीचा फरक हा शासनाचा अध्यादेश निघाला की लगेच देतो आणि कारखान्याची परिस्थिती सुधारल्यावर साखर व दोनशे रुपये देऊ, असे आश्वासन दिले. अजित पाटील, निवास पाटील, हंबीरराव पाटील यांनीही विविध मुद्दे उपस्थित केले. कार्यकारी संचालक सागर पाटील यांनी स्वागत केले. सचिव उदय मोरे यांनी अहवाल वाचन केले. चर्चेत माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील, डॉ. जालंदर पाटील यांनीही विविध विषयांमध्ये सहभाग घेतला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, क्रांतिसिंह पाटील, पी. डी. धुंदरे, उपस्थित होते. आर. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी आभार मानले.