कोल्हापूर : जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये, विशेषतः पश्चिम भागातील ऊस पट्ट्यात, हुमणीचा प्रादुर्भाव गंभीर स्वरूप धारण करत आहे. यंदा पहिल्यांदाच हुमणीचे भुंगे फेब्रुवारी ते एप्रिलच्या दरम्यान आढळून आले. सततच्या पावसामुळे त्यावर शेतकऱ्यांना नियंत्रण करणे शक्य झाले नाही. यामुळे सध्या जिल्ह्यात माळरानावरील हुमणीचा प्रादुर्भाव वेगात होत आहे. विशेष करून खोडवा ऊस व भुईमुगाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे सलग दोन महिन्यांच्या पावसामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. भुंगे व किडीचे नियंत्रण करणे शक्य झाले नसल्याचा विपरित परिणाम विशेष करून खोडवा ऊस व भुईमुगासारख्या खरीप पिकांवरही दिसून येत आहे.
सध्या ऊस व भुईमूग या पिकांवर हुमणी अळीने हल्ला केल्याने उभ्या पिकांचे भवितव्य अनिश्चित ठरत आहे. तर कृषी विभागाने अद्याप शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या नाहीत, असे सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट होत असताना कृषी विभागाचे दुर्लक्ष शेतकऱ्यांच्या संतापात भर पडली आहे. या किडीचा वाढता प्रादुर्भाव जिल्ह्याच्या कृषी अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम करू शकतो. त्यामुळे हुमणी नियंत्रणासाठी प्रभावी फवारणी कीटकनाशके उपलब्ध करून देण्याबरोबरच शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात हुमणीने गंभीर स्वरूप धारण केले आहे.
शिरोळ तालुक्यात हुमणीमुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील ऊस धोक्यात आला आहे. हुमणीच्या या गंभीर धोक्याचा सामना करण्यासाठी कृषी विभाग, साखर कारखाने आणि शेतकरी संघटनांनी सामूहिक फवारणी मोहीम हाती घ्यावी आणि हुमणीचे जीवनचक्र तोडण्यासाठी एकाच वेळी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे.