कोल्हापूर : जिल्ह्यातील ऊस गाळप १२१ लाख टनांवर, राज्यात सर्वाधिक ११.१३ टक्के उतारा

कोल्हापूर : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगामाची अंतिम टप्प्याकडे वाटचाल सुरू आहे. आतापर्यंत तब्बल १२१ लाख ५ हजार टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून, त्यातून १३४ लाख ७५ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ११.१३ टक्के असून, हा उतारा राज्यातील सर्वाधिक उतारा आहे. जिल्ह्याने राज्यात साखर उताऱ्यातील आघाडी कायम राखली आहे. काही ठिकाणी ऊस वेळेत उचलला जात नसल्याने वजन घटण्याची भीती शेतकऱ्यांत आहे. अनेक भागात तोडणी मजूर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना स्वतःच ऊसतोड करावी लागत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून दिवसा उन्हाचा तडाखा वाढला असून, याचा थेट परिणाम ऊस तोडीवर होत आहे. वाढते तापमान आणि विलंबामुळे साखर उताऱ्यावर परिणाम होण्याचे धोकेही निर्माण झाले आहेत.

जिल्ह्यात १५ सहकारी व ७ खासगी असे २२ कारखाने ऊस गाळप करत आहेत. काही कारखान्यांनी उताऱ्याबाबत चांगली कामगिरी केली आहे. वारणानगरच्या तात्यासाहेब कोरे साखर कारखान्याने १२.७२ टक्के, कुंभी साखर कारखान्याने १२.५३ टक्के, तर कल्लाप्पाण्णा आवाडे व सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याने १२.२२ टक्के साखर उतारा नोंदवला आहे. भोगावती कारखान्याचा उतारा १२.०६ टक्के आहे. जिल्ह्यात साखर उतारा चांगला आहे. मात्र, वेळेत ऊसतोड होत नसल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होत नाही. उन्हामुळे उसाचे वजन घटत आहे. यातच वेळेत ऊसतोड केली जात नाही. याचे योग्य नियोजन झाले पाहिजे, असे मत शेतकरी सर्जेराव देसाई यांनी व्यक्त केले. सर्वच कारखान्यांच्या ऊस तोडणी आणि वाहतुकीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here