कोल्हापूर : येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या (गोडसाखर) आगामी गळीत हंगामासाठी तोडणी व ओढणी कंत्राटदारांच्या करारांना गती देण्यात आली आहे. गाळप क्षमतेसह आसवनी निर्मितीची क्षमताही वाढविण्यात येणार आहे. कारखान्यातर्फे करार पूर्ण झालेल्या कंत्राटदारांना ॲडव्हान्स रकमेचे वाटपही केले. करार पूर्ण झालेल्या कंत्राटदारांना चार लाखांच्या धनादेशांचे वितरण कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, संचालक सतीश पाटील, अशोक मेंडुले, बाळासाहेब देसाई, विद्याधर गुरबे, कार्यकारी संचालक एस. वाय. महिंद, प्र. सचिव शामराव हरळीकर, शेती अधिकारी व्ही. बी. पाटील आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.
अध्यक्ष प्रकाश पताडे म्हणाले की, केडीसीसी बँकेतर्फे मिळालेल्या कर्जाचा विनियोग योग्य व गरजेच्या कामावर करण्यात येत आहे. अधिकाधिक उपपदार्थनिर्मितीवर कारखान्याचा भर असून, त्याद्वारे शेतकऱ्यांना जादा दर देणे शक्य होणार आहे. गाळप उद्दिष्टपूर्तीचा फायदा शेतकरी, कामगारांनाच होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी संपूर्ण ऊस कारखान्याला पाठवावा. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून कारखान्याला अर्थसाहाय्य केले आहे. त्यामधून गाळप क्षमता प्रतिदिन ३५०० टन आणि २५ केएलपीडी क्षमतेच्या आसवनीची उभारणी करण्यात येणार आहे. कारखान्याने आगामी गळीत हंगामात चार लाख टनांचे गाळप करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी ऊस क्षेत्राच्या नोंदीचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.