कोल्हापूर : राज्य सरकारने महाराष्ट्रातील साखर कारखाने १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात आगामी गळीत हंगामासाठी मराठवाड्यातून ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या दाखल होऊ लागल्या आहेत. आठवडाभरात शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील साखर कारखाने गव्हाणीत मोळी टाकून हंगामाचा शुभारंभ करतील. अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या ऊस हंगामासाठी शिरोळ, हातकणंगले तालुक्यांसह जिल्ह्यात जय्यत तयारी सुरू आहे. ऊस टंचाईच्या पार्श्वभूमीवर सीमा भागातील कारखान्यांनी हंगामाची तयारी सुरू केली आहे. आता ऊस दराच्या मुद्यावर तोडगा काढावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
दरम्यान, दरवर्षी कर्नाटकातील साखर हंगाम किमान पंधरा दिवस आधी सुरू होतो. यंदा तो सोमवारपासून, दि. २० ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. कर्नाटकातील कारखाने खास करून कागल, शिरोळ, हातकणंगले, सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर ऊस पळवतात. गेल्यावर्षी कर्नाटकातील कारखान्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊस पळवला होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या सीमा भागातील साखर कारखान्यांमध्ये चिंतेत आहेत. शेतकरी संघटनांनी ऊस दरप्रश्नी राज्य सरकार आणि कारखानदारांना काही दिवसांची मुदत दिली आहे. जिल्हा प्रशासनाने यात मध्यस्थी करून समन्वय घडवून आणण्याची मागणी केली जात आहे. अन्यथा ऊस दरासाठी सुरू झालेल्या आंदोलनाचा लाभ कर्नाटकातील कारखान्यांकडून उठवला जाण्याची शक्यता आहे.












