कोल्हापूर : गडहिंग्लज उपविभागात ऊस तोडणीची परवड, तब्बल तीन लाख टन ऊस शेतातच

कोल्हापूर : गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यात अजूनही साधारण तीन ते साडेतीन लाख टन ऊस शेतातच उभा आहे. साधारण १० ते १५ फेब्रुवारीपर्यंत यंदाचा हंगाम चालेल, अशी शक्यता कारखान्यातील सूत्रांनी वर्तविली आहे. गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यात दरवर्षी साधारण १७ ते १८ लाख टन उसाचे उत्पादन होते. सर्वाधिक चंदगड, त्यानंतर गडहिंग्लजमध्ये उसाचे उत्पादन अधिक आहे. विभागातील पाचही साखर कारखान्यांचा हंगाम गतीने सुरू आहे. मात्र, उसाला आलेले तुरे, वजनातील घटीमुळे न होणारी ऊस भरती आणि मरगळलेली तोडणी यंत्रणा यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

आतापर्यंत हरळी (ता. गडहिंग्लज)च्या आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याने १ लाख ६७ हजार टन ऊस गाळप केले आहे. तर हलकर्णी (ता. चंदगड) च्या अथर्व दौलत कारखान्याने ३ लाख १३ हजार टन ऊस गाळप केले. इको-केन कारखान्यात २ लाख ६५ हजार टन तर ओलम – हेमरस कारखान्यामध्ये ४ लाख ३२ हजार टन गाळप झाले आहे. तालुकानिहाय शिल्लक ऊस पाहिला असता गडहिंग्लज तालुक्यात सव्वालाख टन ऊस शिल्लक आहे. तितकाच ऊस चंदगड तालुक्यात आहे. आजरा तालुक्यात ७५ हजार टन ऊस शिल्लक आहे. या भागातील उसाला उतारा चांगला असतो. परंतु, यंदा झेंड्यामुळे काही कारखान्यांच्या उताऱ्यातही घट आल्याचे सांगण्यात आले. गडहिंग्लज साखर कारखान्याचा दरवर्षी १२ पर्यंत जाणारा ऊस उतारा यंदा साडेअकरापर्यंतच आहे. शिल्लक ऊस पाहून ऊस तोडणी टोळ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here