कोल्हापूर : महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्यावतीने ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. ऊसतोड व वाहतूक कामगारांची नोंदणी करून हंगामापूर्वी ओळखपत्रे व सेवापुस्तिका द्याव्यात, कारखान्यांककडून गेल्या चार वर्षांचा कल्याणकारी निधी वसूल करावा, निधी न भरणाऱ्या कारखान्यांना गाळपास परवानगी देऊ नये आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. याबाबतचे निवेदन साखर सहसंचालकांना देण्यात आले.
गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी कामगार महामंडळाची प्रत्येक जिल्ह्यात समित्या स्थापन करून त्यामध्ये संघटनेचे दोन प्रतिनिधी घ्यावेत, गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर सात दिवसांत कामगारांची यादी सादर करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच कारखाना स्थळावर निवास, शुद्ध पाणी, वीज, स्वच्छतागृह, कामगारांची आरोग्य तपासणी, लसीकरण, गरोदर महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, जिल्ह्यात किमान चार व राज्यात ८२ वसतिगृहे सुरू करावीत. मुला-मुलींना शैक्षणिक शिष्यवृत्ती द्यावी. साठ वर्षांवरील कामगारांना ग्रॅच्युईटी व दरमहा किमान ५ हजार रुपये पेन्शन द्यावी, अनावश्यक विमा उतरवून घेतलेल्या प्रीमियमची रक्कम कामगारांना परत द्यावी अशी मागणी कामगार प्रतिनिधींनी केली. या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा. सुभाष जाधव, रामचंद्र कांबळे, पांडुरंग मगदूम, संभाजी कांबळे आदी उपस्थित होते.