कोल्हापूर : अरळगुंडी येथे उसाच्या फडांना लागलेल्या आगीत १७ शेतकऱ्यांचे ३५ एकरातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.गडहिंग्लज नगरपालिकेसह कर्नाटकमधील संकेश्वर आणि यमकनमर्डी येथील अग्निशमन दलाच्या पथकांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या आगीत रवींद्र पाटील, राजश्री हंचनाळे, दीपक हंचनाळे, शिवानंद वाळकी, शंकर वाळकी, बसगोंडा पाटील, परगोंडा पाटील, अशोक हुक्केरी, श्रीकांत हुक्केरी, उमेश गोणी, शंकर गोणी या शेतकऱ्यांचा ऊस आगीत भस्मसात झाला. आपल्या शेतात तोडलेल्या उसाला आग लागू नये यासाठी प्रयत्न करणारे शंकर वाळकी व मंगल वाळकी हे पती-पत्नी भाजून जखमी झाले.
शंकर वाळकी यांच्या शेतातील ऊस तोडणी व ऊस भरणी सुरू होती. यांदरम्यान, तेथे असलेल्या राजू यादगुडी यांना शंकर गोणी यांच्या उसाच्या फडाला आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यांनी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना आगीची माहिती दिली. मात्र, जोरदार वाऱ्यामुळे आग पसरली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्यान्नावर यांनी तत्काळ दूरध्वनीवरून संकेश्वर, हिरा शुगर कारखाना, एकस उद्योग व गडहिंग्लज पालिका येथील अग्निशमन दलांना पाचारण केले. अग्निशामक दलांच्या संयुक्त प्रयत्नांनी सुमारे २५ एकरातील ऊस आगीपासून वाचविण्यात यश आले. आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही.


















