कोल्हापूर : यावर्षीच्या ऊसदर आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी आंदोलन अंकुश संघटनेची नृसिंहवाडी येथे रविवारी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते रघुनाथ पाटील गुरुजी होते. यंदा कारखानदारांनीच पुढे होऊन सप्टेंबरअखेरपर्यंत संघटनांबरोबर चर्चा करून ऊस दरावर तोडगा काढावा, अशी मागणी ‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केली. गाळप हंगामाला अद्याप बराच अवधी आहे. कारखाने लवकर सुरू होऊन शेतकऱ्यांचा ऊस लवकर तुटावा, अशीच आमची भूमिका आहे. दुसरा हप्ता देऊन कारखाने वेळेत सुरु करा हे सांगण्यासाठी आम्ही सोमवारी, दि. १५ रोजी दत्त, गुरुदत्त आणि शरद साखर कारखान्याला मोटारसायकल रॅलीने निवेदने देणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
चुडमुंगे म्हणाले की, हंगामाच्या तोंडावर संघटना आंदोलन करून कारखाने बंद पाडतात आणि त्यामुळे हंगाम लांबून शेतकऱ्यांचा ऊस वेळाने तुटतो असे कारखान्यांचे म्हणणे असेल; तर आम्ही यावर्षी आंदोलन करत नाही. मात्र कारखानदारांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. गेल्या तीन वर्षात साखर व प्राथमिक उपपदार्थ असलेल्या बगॅस व मळीचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. कारखान्यांनी आपल्याला झालेला फायदा पाहून शेतकऱ्यांना स्वतःहून गत हंगामात तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता द्यायला पाहिजे होता. हंगामाच्या तोंडावर आंदोलन नको असेल तर कारखान्यांनीच आता पुढाकार घेऊन तोडगा काढावा. जास्तीत जास्त शेतकरी, कार्यकर्त्यांनी रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन चुडमुंगे यांनी केले.