कोल्हापूर: भोगावती कारखान्याकडून प्रतिटन ३,६५३ रुपयांप्रमाणे ऊस दर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याने यावर्षीच्या हंगामातील गाळप झालेल्या १९ हजार टन उसाची बिले जमा केली आहेत. प्रतिटन ३ हजार ६५३ रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी दिली. भोगावती कारखान्याने यंदाच्या हंगामासाठी प्रतिटन ३ हजार ६५३ रुपये एवढा उच्चांकी दर जाहीर केला आहे. पहिल्या टप्प्यात गाळप झालेल्या १९ हजार ८०२ मॅट्रिक टन उसाच्या बिलापोटी ७ कोटी २३ लाख ३८ हजार ३८७ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत.

यंदाच्या हंगामात कारखान्याने १ डिसेंबरअखेर वीस दिवसांत ८६ हजार ०६० मेट्रिक टन ऊस गाळप करून ८९ हजार २१० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. सरासरी साखर १०.३६ टक्के एवढा आहे. कारखान्याने यावर्षी जाहीर केलेला दर हा राज्यात उच्चांकी असून कारखान्याकडे उसाचा ओघ वाढत आहे. यावर्षीच्या हंगामात भोगावती साखर कारखान्याने सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ते पूर्ण करण्यासाठी कारखाना प्रशासन प्रयत्न करत आहे. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याला पुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहन पाटील व कवडे यांनी केले. यावेळी सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक सागर पाटील, जनरल मॅनेजर संजय पाटील व अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here