कोल्हापूर : जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर बॉयलर पेटवला आणि दिवाळीत उसाची मोळी गव्हाणीत टाकली आहे. माजी खासदार संजय मंडलिक यांनी प्रतिटन ३,४१० रुपये पहिली उचल देण्याची घोषणा करुन ‘हमीदवाडा’ कारखान्याचा हंगाम सुरू केला आहे. तर ‘वारणा’ कारखान्याच्या तोडण्याही सुरू आहेत. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरू झाल्याने शिवारात पाणी उभे राहिले आहे. त्यात ऊस दराचाही अडसर आहे. पाऊस थांबल्यानंतरच समन्वयाने यातून तोडगा निघू शकतो आणि त्यानंतर गळीत हंगामाला गती मिळू शकेल असे साखर उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सर्वच कारखाने उसाच्या तोडण्या देण्याच्या तयारीत असताना गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. थोडा जरी पाऊस झाला तरी चिखल तयार होत असल्याने ऊसतोडणी यंत्रणेपुढे आव्हान आहे. याशिवाय, साखर कारखान्यांच्या गाळपात ऊस हा सगळ्यात मोठा मुद्दा असेल अशी शक्यता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत प्रतिटन ३७५० रुपये पहिल्या उचलीची मागणी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रभाव क्षेत्र असलेल्या शिरोळ तालुक्यातील ‘दत्त’ व ‘गुरुदत्त’ या दोन कारखान्यांनी अद्याप मोळी पूजन केलेले नाही. पाऊस आणि उचलीची कोंडी कशी फोडायची? याचा अंदाज घेऊनच हंगाम सुरू होऊ शकतो. तर ‘आंदोलन अंकुश’ची ऊस दराबाबतची एल्गार परिषद उद्या, रविवारी होत आहे. येथे संघटना किती ऊस दराची मागणी करणार? याकडेही हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.











