कोल्हापूर : शेतकऱ्यांसाठी ऊस पाचट व्यवस्थापन स्पर्धा, पॉवर विडर, स्प्रे पंप मिळणार बक्षीस

कोल्हापूर : शेतात ऊस काढणीपश्चात पाचट जाळल्यामुळे मातीची सुपीकता कमी होते व पर्यावरणाला हानी पोहोचते. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाचट जाळू नये आणि त्याचे व्यवस्थापन करावे. यातून जमिनीचा पोत सुधारण्यास तसेच शेती खर्चात बचत होण्यास मदत होते. ऊस शेतीतील शेतकऱ्यांना पाचट व्यवस्थापनाचे महत्त्व समजावे यासाठी करवीर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ऊस पाचट व्यवस्थापन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. करवीर तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या योजनेत आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

ऊस काढणीनंतर शेतात राहणारे पाचट न जाळता त्याचे कुजवण करून सेंद्रिय खतामध्ये रूपांतर करण्यावर या योजनेत भर देण्यात आला आहे. जैविक घटकांच्या वापरामुळे कीडनियंत्रण प्रभावी होऊन उत्पादनवाढीस हातभार लागणार आहे. योजनेत विजेत्या ठरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पॉवर विडर, बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप, एचडीपीई बॅग, हुमणी सापळे, मेटारायझियम जैविक औषध तसेच पाचट कुजविणारे जिवाणू कल्चर आदी साहित्य बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पाचटाचे शास्त्रीय व पर्यावरणपूरक व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे. करवीर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आवाहन तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here