कोल्हापूर : कागल तालुक्यात तब्बल २५ हजार ६७१ हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड झाली आहे. यापूर्वी तालुक्यात लोकरी माव्याचा प्रादुर्भाव दिसून आला होता. त्यात भर म्हणून आता तांबेरा रोगाचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. बदलत्या हवामानामुळे तालुक्यातील सुमारे ८० टक्के ऊस पिकावर कमी-अधिक प्रमाणात तांबेऱ्याचा प्रादुर्भाव झाला आहे. गेले साडेतीन महिने झालेल्या सततच्या पावसामुळे आणि आर्द्र हवामानामुळे या रोगाला पोषक वातावरण मिळाले. त्यामुळे या रोगाचा फैलाव वेगाने होत असून, उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत आहे.
काही ठिकाणी ड्रोनद्वारे फवारणीची मागणी होत असली, तरी ती सर्व शेतकऱ्यांना शक्य नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. सद्यःस्थिती हाताळली नाही, तर रोगाचा फैलाव वाढून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. कृषी तज्ज्ञांनी वेळेवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. सध्या उसाच्या पानांवर पिवळे व नारिंगी ठिपके दिसून येत असून, नंतर ते तांबूस होऊन पाने वाळू लागली आहेत. याबाबत शेती अभ्यासक प्रयाग मुजूमदार म्हणाले की, सद्यःस्थितीत उसावर पडणाऱ्या तांबेरा व मावा शेतकऱ्यांना फार तापदायक आहे. त्यावर उपाय म्हणून टेबुकोनोजल १० टक्के + सल्फर ६५ टक्के व माव्यासाठी क्लोरोपायरीफॉस ५० टक्के ईसी हे फवारावे. तसेच जमिनीमध्ये वापसा आणवा.