कोल्हापूर : ‘पंचगंगा’ विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, संचालक मंडळाच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब

कोल्हापूर : दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या बिनविरोध निवडीबाबत कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायाधीश एस. जी. चपळगावकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात कारखान्याच्या सभासद रजनी मगदूम व अशोक पाटील यानी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. सोमवारी न्यायमूर्ती विक्रम नाथ व संदीप मेहता यांच्या खंडपीठाने ते अपील फेटाळले. यामुळे कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले व कारखान्याच्या विरोधकांना मोठी चपराक बसली आहे. पी. एम. पाटील गटास दुसऱ्या वेळी निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळाले.

चेअरमन, व्हा. चेअरमन निवडीचा मार्ग मोकळा झाला, अशी माहिती ॲड. एन. बी. पाटील-टाकवडे व संचालक प्रमोद पाटील यानी दिली. अपील फेटाळल्याचे समजताच पी. एम. पाटील गटाच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. सुमारे ११ महिन्यांपूर्वी कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली होती; मात्र विरोधकांनी सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून त्यास स्थगिती मिळवत फेरनिवडणुकीचे आदेश मिळवले होते.

तथापि, पी. एम. पाटील गटाने त्यास विरोध न करता निवडणुकीस सामोरे गेले. दरम्यान, कसबा सांगाव येथील बाबासाहेव मगदूम व इतरांनी या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात पिटीशन दाखल करून स्थगिती मिळवली. यानंतर मुंबई व कोल्हापूर येथील न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने सहकार निवडणूक प्राधिकरणाचा फेर निवडणुकीचा आदेश रद्द ठरविला. या निकालाविरोधात सौ. मगदूम व पाटील यांनी चार आठवड्यांची मुदत मागत सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायालयाने सोमवारी हे अपील फेटाळले. माजी चेअरमन पी. एम. पाटील म्हणाले कि, विरोधकांनी खोटेनाटे आरोप करून सभासद व न्यायालयाची दिशाभूल करून करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटपर्यंत त्यांना यश आले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here