कोल्हापूर : गडहिंग्लज विभागातील कारखान्यांनी थकबाकी देऊनच ऊस तोडणी करण्याची ‘स्वाभिमानी’ची मागणी

कोल्हापूर : गडहिंग्लज विभागातील कारखान्यांनी मागील एफआरपीच्या फरकातील ३१ कोटी तातडीने द्यावेत, अन्यथा ऊसतोड करू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर यांनी दिला. आजरा कारखान्याने १५ नोव्हेंबरपर्यंत थकीत रक्कम देण्याचे लेखी पत्र दिले आहे. या कारखान्याकडे ३.६१ कोटी रुपये थकीत आहेत. तर मागील एफआरपी फरकातील व प्रतिटन ५० रुपये देय रक्कम ओलम (९.१० कोटी), इको-केन (७.१३ कोटी), दौलत-अथर्व (११७ रुपये याप्रमाणे फरकाचे ४ कोटी, ५० रुपये फरकाचे २ कोटी ३१ लाख रुपये), गडहिंग्लज (३ कोटी ७० लाख) येणे आहे. ही रक्कम देण्यासह सर्व साखर कारखान्यांनी १३ टक्के साखर उतारा ग्राह्य मानून ३६०० रुपये पहिली उचल द्यावी अशी मागणी गड्ड्यान्नावर यांनी पत्रकार परिषदेत केली.

गड्ड्यान्नावर यांनी गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीही एकजुटीने ऊसदराच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले की, गेल्या हंगामात आजरा कारखान्याचा साखर उतारा ११.९०, ओलम ११.६८, इको-केन १२.२४, दौलत – अथर्व १२.३१, गडहिंग्लज ११.२१, इतका होता. त्यामुळे सरासरी १३ टक्के उतारा ग्राह्य मानून पहिली उचल प्रतिटन ३६०० रुपये मिळाली पाहिजे. गडहिंग्लज कारखान्याच्या गळीताला आमच्या शुभेच्छा आहेत अशी टिप्पणी त्यांनी केली. यावेळी बसवराज मुत्नाळे, सुभाष पाटील, दिलीप बेळगुद्री, धनाजी पाटील, बाबासाहेब आजरी, अशोक पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here