कोल्हापूर : जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी गळीत हंगाम २०२५-२६ साठी उसाची पहिली उचल ३६०० रुपये जाहीर केली आहे. त्यामुळे अथर्व प्रशासनाने यंदाच्या गळीत हंगामातील सुरुवातीला दौलत कारखान्याचा दर जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र, व्यवस्थापनाने अद्याप कोणताही दर जाहीर केला नाही. इतर माध्यमातून ‘अथर्व दौलत’ कारखान्याचा दर जाहीर होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. कारखान्याने पहिली उचल ३६०० रुपयेच जाहीर करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली. याबाबत संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दीपक पाटील यांनी ‘अथर्व दौलत’ प्रशासनाला निवेदन दिले.
अथर्व प्रशासनाने २०२४-२५ च्या हंगामासाठी ओलम साखर कारखान्याप्रमाणे दर द्यावा आणि चालू गळीत हंगामात ३,६०० रुपये उचल द्यावी, अशी मागणी संघटनने केली. याशिवाय, माजी खासदार राजू शेट्टी यांनी २०२२-२३ मध्ये या गळीत हंगामातील ‘एफआरपी’ व्यतिरिक्त प्रतिटन ५० रुपयांसाठी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी मध्यस्ती केली होती. ही २ कोटी ३१ लाख रुपये रक्कम कारखान्याने तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी तालुकाध्यक्ष जगन्नाथ हुलजी, विश्वनाथ पाटील, गोपाळ गावडे, पिंटू गुरव, गजानन राजगोळकर, बाळाराम फडके, विश्वास कुंभार, राजेंद्र पाटील, ज्योतिबा पोवार, गोपाळ नागुर्डेकर, सातू रामगावडे, मारुती अर्जुन गावडे, हणमंत सावंत उपस्थित होते.

















