कोल्हापूर : गेल्या २३ वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस गळीत हंगाम सुरू होण्याआधी ऊस परिषदेच्या माध्यमातून आंदोलनाचे हत्यार उपसले जाते. दर निश्चिती झाल्यानंतर साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरळीत सुरू होतात. यावर्षी स्वाभिमानीच्यावतीने ऊस परिषदेच्या निमित्ताने सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर व उत्तर कर्नाटक सीमाभागातील गावागावात ऊस परिषदेची तयारी केली आहे. यंदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ही २४ वी ऊस परिषद गुरुवारी (दि. १६) होत आहे. यंदाच्या हंगामात पहिली उचल किती मागायची हे निश्चित होईल. या विषयावर पुढील आंदोलनाची दिशा परिषदेत ठरणार आहे. एकरकमी एफआरपीचा मुद्दाही शेट्टी यांनी लावून धरला आहे.
स्वाभिमानीचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी गेल्या महिनाभरात जनजागृती करत राज्य सरकार व राज्य साखर संघ शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याची भूमिका शेतकऱ्यांसमोर मांडली आहे. यंदाच्या परिषदेत रिकव्हरी, काटामारीचा मुद्दा गाजण्याचे संकेत आहेत. दोन्ही विषयांवर शेट्टी यांनी जोरदार भूमिका मांडली आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांबरोबर कारखानदारांचेही लक्ष या परिषदेकडे असणार आहे. याबाबत स्वाभिमानी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल मोरे म्हणाले की, गेल्या पंधरा दिवसांपासून विविध भागामध्ये शेतकरी मेळावे, पदाधिकारी बैठका तसेच प्रसारमाध्यमातून ऊस परिषदेची तयारी केली आहे. गेल्या पाच वर्षात एफआरपीमध्ये ६५० रुपयांची वाढ झाली. मात्र, उसाचा दर ३००० ते ३२०० पर्यंत स्थिर राहिला. उत्पादन खर्च वाढला. त्याचा उहापोह परिषदेत होईल.