कोल्हापूर : आर्थिक उणे नेटवर्थमुळे अडचणीतून मार्गक्रमण करणाऱ्या आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याला (गोडसाखर) गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेने आर्थिक सहाय्याद्वारे आधार दिला आहे. बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नामुळे कारखान्याच्या चाकांनी गती घेतली आहे. गेली दोन वर्षे केडीसीने दिलेल्या अर्थसहाय्यातून व्यवस्थापनाकडून कारखान्याचे आधुनिकीकरण करत शेतकऱ्यांना एफआरपी, कामगारांचे पगार, तोडणी ओढणी यंत्रणेची बिले देण्याची प्रक्रिया सुरळीत ठेवण्यात आली आहे. कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून (एनसीडीसी) २२० कोटींचे कर्ज हवे आहे. त्यासाठी राज्य शासनाची थकहमी मिळविण्यासाठी पाठपुरावा गतीने सुरू झाला आहे.
या आर्थिक निधीतून डिस्टिलरी विस्तारीकरणासह बायोगॅस प्रकल्प आणि इतर महत्त्वाच्या कामांतून कारखान्याला नवा चेहरा देण्यास मदत होणार आहे. यंदाच्या हंगामासाठी कारखाना आधुनिकीकरण व नूतनीकरणाद्वारे सज्ज केला आहे. आतापर्यंत केलेल्या कामामुळे कारखान्याची चाके किमान दहा वर्षांपर्यंत चालतील. परंतु; कारखान्याला आणखी भक्कम करण्यासाठी मुश्रीफ यांच्या माध्यमातूनच कारखाना व्यवस्थापनाने एनसीडीसीकडे कर्ज मागणी केली आहे. साधारण २२० कोटींची गरज लागणार असून, त्याच्या विनियोगाचे नियोजनही प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आले आहे. आवश्यक असलेली शासनाच्या थकहमीसाठी मुश्रीफ यांच्या माध्यमातूनच प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.


















