कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नेहमीच या विभागातील आजारी सहकारी कारखाने कोणाच्या मालकीचे न होता ते सहकारातच राहावेत, यासाठी कटाक्षाने नियोजन केले. हलकर्णी येथील दौलत कारखाना हा चंदगड तालुक्याच्या सहकाराचा मानबिंदू आहे. अनेक सहकारी संस्थांची मातृसंस्था आहे. आर्थिक स्थिती नसताना सभासदांनी कर्जे काढून भागभांडवल उभारणी करून कारखाना उभा केला आहे. त्यामुळे बँकेने एनसीडीसीचे कर्ज भरून कारखान्यावरील सभासदांची मालकी कायम ठेवावी, असे आवाहन दौलत बचाव कृती समितीने केले. कोल्हापूर येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने त्यांना निवेदन दिले.
दौलत बचाव कृती समितीचे सुभाष देसाई, चंद्रशेखर गावडे, शंकर मनवाडकर, शामराम मुरकुटे, विष्णू गावडे, दयानंद कांबळे, प्रा. दीपक कांबळे, तानाजी गोंधळी आदींच्या शिष्टमंडळाने मुश्रीफ यांच्यासह आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, माजी खासदार संजय मंडलिक, निवेदिता माने यांनाही निवेदन दिले. एनसीडीसीने दौलत सहकारी साखर कारखान्याकडील थकीत कर्जासाठी लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने यात सहभाग घेऊन ही प्रक्रिया थांबवावी. जिल्हा मध्यवर्ती बँकेने हा कारखाना अथर्व इंटरट्रेड कंपनीला ३९ वर्षांच्या भाडे कराराने दिला आहे. जिल्हा बँकेने थकीत रक्कम भरून कंपनीकडून १२ टक्के दराने वसूल करायची आहे. त्यानुसार हा व्यवहार पूर्ण करावा. हा कारखाना सभासदांच्याच मालकीचा राहावा यासाठी प्रयत्न करावेत. तालुक्यातील सहकार वाचवावा,’ असे आवाहन समितीने केले आहे.