कोल्हापूर : भोगावती सहकारी साखर कारखान्याने गेल्या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गाळपाला प्रोत्साहनपर दर जाहीर केला होता. गेल्या हंगामात २३ ते २८ फेब्रुवारी २०२५ या काळात गाळप केलेल्या उसासाठी प्रतिटन ५० रुपये प्रोत्साहनपर दर जाहीर केला. या काळातील २४,७०६ टन उसाच्या बिलापोटी १२,३५,४०० रुपये तसेच १ ते १० मार्चदरम्यान गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन १०० रुपये प्रोत्साहन दर जाहीर केला. या काळातील २८,५२८ टन बिलापोटी २८,५३,०६८ रुपये संबंधित ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील व उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी दिली.
याबाबत अध्यक्ष पाटील यांनी सांगितले की, कारखान्याने प्रोत्साहनपर दरापोटी एकूण ४० लाख ८८ हजार ४६८ रुपये ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केले आहेत. यंदा हंगामातील उसाला प्रतिटन ३ हजार ६५३ रुपये विक्रमी दर जाहीर केला असून पहिल्या पंधरवड्यातील बिले दिली आहेत. यंदा कारखान्याने सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. उत्पादकांनी ऊस कारखान्याला पाठवावा असे आवाहन अध्यक्ष पाटील, उपाध्यक्ष कवडे यांनी केले. यावेळी संचालक, कार्यकारी संचालक सागर पाटील, जनरल मॅनेजर संजय पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

















