कोल्हापूर : जमीनीची उत्पादकता घटून शेती आर्थिकदृष्ट्या तोट्यात जात असल्याने शेतकरीवर्गाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषि उत्पादनात वाढ करणे गरजेचे असून साखर कारखान्याने आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील-सडोलीकर यांनी केले. शाहूनगर परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने स्व. आमदार पी एन पाटील सडोलीकर यांच्या ७३ व्या जयंतीनिमित्त आयोजित चार दिवसीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील होते.
पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष क्रांतीसिंह पवार-पाटील यांनी भोगावती कारखान्याचा हा उपक्रम स्तुत्य असून शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादकता वाढ करण्याशिवाय पर्याय नाही, असे सांगितले. कारखान्याचे अध्यक्ष प्रा शिवाजीराव पाटील यांनी भोगावती कारखान्याच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात १५० हुन अधिक स्टॉल आहेत. यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक अरुण डोंगळे, बाळासाहेब खाडे, माजी संचालक पी. डी. सुंदरे, वसंतराव पाटील, दिगंबर मेडसिंगे, उपाध्यक्ष मोहन पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम कवडे, सर्व संचालक, माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, संजयसिंह पाटील धैर्यशील पाटील, कार्यकारी संचालक सागर पाटील, जनरल सेक्रेटरी संजय पाटील यांच्यासह सभासद उपस्थित होते. उपाध्यक्ष राजेंद्र कबडे यांनी आभार मानले.

















