कोल्हापूर : साखर कारखाने केवळ एफआरपी देऊन शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. कारखाने नफ्यात असतानाही कमीत कमी दर देऊन फसवत आहेत. रिकव्हरीतून शरद, गुरुदत्त, जवाहर व दत्त आदी कारखाने प्रत्येकवर्षी शंभर कोटींपेक्षा जास्त पैसे मिळवत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चालू वर्षाची पहिली उचल चार हजार रुपये व गेल्या वर्षीचे दोनशे रुपये दिल्याशिवाय उसाला कोयता लावू देणार नाही, असा इशारा ‘आंदोलन अंकुश’चे संस्थापक धनाजी चुडमुंगे यांनी आठव्या एल्गार परिषदेमध्ये दिला.
चुडमुंगे म्हणाले, ‘आंदोलन अंकुश’ने प्रामाणिकपणे शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले आहे. कारखान्यांच्या आमिषाला आम्ही कधीही बळी पडलो नाही. दहा वर्षांपूर्वी साखर कारखाने, जे दर देत होते, तोच दर आजही देत आहेत. तोडणी वाहतूक व रिकव्हरी चोरून केवळ एफआरपी दिली जात आहे. साखरेचे दर व उपपदार्थांचे दर उच्चांकी मिळाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उसालाही यावर्षीची पहिली उचल चार हजार रुपये जाहीर करावी. तसेच गेल्या वर्षीचे दोनशे रुपये तत्काळ द्यावेत, अन्यथा उसाला कोयता लावू देणार नाही. शेतकऱ्यांनीही ऊस तोडी नाकाराव्यात, असे चुडमुंगे यांनी आवाहन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, उदय होगले, कृष्णात देशमुख, अक्षय पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
एल्गार परिषदेतील ठराव असे…
पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन ऊस दरावर तोडगा काढावा.
कारखानदारीतून ‘सरासरी’ या पद्धतीला हद्दपार करावे.
शासनाने प्रतिटनाला लावलेली २७.५० रुपये वजावट रद्द करावी.
साखरेची एमएसपी ४० रुपये करावी.
साखरेवरील निर्यात बंदी आणि कोठा पद्धत उठवावी.
कारखान्यांच्या वजन काट्याच्या इंडिकेटरला संगणक जोडण्यास मनाई करावी.
तोडणी वाहतूक खर्च किलोमीटरच्या अंतरानुसार आकारावा.
वाहनातच रिकव्हरी काढणारे केन सॅम्पलिंग मशीन कारखान्यांना सक्तीचे करावे.












