कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये करवीर, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा आणि कागल तालुक्यांतून गुळाची आवक होते. मागील काही वर्षांत गुळ उत्पदानाचा वाढलेला खर्च, अकुशल व कामगारांची अपुरी संख्या यामुळे कोल्हापूरच्या गुळ उद्योगाला घरघर लागली होती. मात्र, यंदाच्या हंगामात हे चित्र पालटले आहे. नियमितपणे सुरू राहिलेली गुऱ्हाळ घरे, बाजारात मिळालेला समाधानकारक दर यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोल्हापूर बाजार समितीमध्ये २.२१ लाख गूळ रव्यांची आवक जादा झाली. गतवर्षी जानेवारीअखेर १६ लाख १८ हजार ३२३ गुळ रव्यांची आवक झाली होती. तर यंदा १९ लाख ४ हजार ९८८ गुळ रव्यांची आवक झाली आहे.
यंदा जानेवारी अखेरपर्यंत गुळाच्या खरेदी विक्रीतून २३४.३१ कोटी रुपये इतकी उलाढाल झाली आहे. सन २०२४-२५ च्या हंगामात २४१.२५ कोटींची उलाढाल झाली होती. कोल्हापूर बाजार समितीमध्ये येणारा गूळ हा संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह आखाती देशात पाठवला जातो. यंदाच्या हंगामात गुळाचा दर समाधानकारक राहिला आहे. आतापर्यंत प्रतिक्विंटल किमान ३,६०० रुपये तर कमाल ५,६०० रुपये इतका दर गुळाला मिळाला आहे. हंगामातील गुळाचा सरासरी दर ४,१०० रुपये राहिला आहे. गेल्यावर्षी सरासरी दर ४,००० रुपये होता. यंदा यात शंभर रुपयांची वाढ झाल्याचे दिसते. मध्यंतरीच्या काळात गुऱ्हाळ घरे तोट्याची ठरू लागली होती.मात्र, यंदाच्या हंगामात गूळ रव्यांची आवक वाढल्याचे समाधानकारक चित्र आहे.

















