कोल्हापूर : साखर कारखान्याकडील वजनकाटे तपासणी भरारी पथकास प्रशिक्षण द्यावे, असा आदेश वैधमापन शास्त्र विभागाने प्रादेशिक सहसंचालक प्रशासनाला दिला आहे. या पथकातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना आठ दिवसांत प्रशिक्षण आयोजित करावे, असे त्यात म्हटले आहे. सध्या काटा तपासणीसाठी कारखानानिहाय पथके तयार करून त्यामध्ये त्या परिसरात काम करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचा त्यात समावेश करण्यात आले आहे. पण अशासकीय सदस्यांना काटा तपासणीसाठीचे शास्त्रीय ज्ञान नसते, असे निदर्शनास आले. त्यामुळे हे प्रशिक्षण आयोजित करण्यात येत असले तरी जिल्ह्यातील उसाचा हंगाम निम्मा संपला आहे. अशा टप्प्यात प्रशिक्षण सदस्य काटा कधी तपासणार? दोष कधी शोधणार? दोषी असलेल्या काट्यावर कारवाई कधी होणार ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
साखर कारखान्यांच्या काटामारीचा विषय प्रत्येक वर्षी हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकरी संघटना ऐरणीवर आणतात. मात्र त्यांना हंगामापूर्वी प्रशिक्षण दिले जाणे गरजेचे आहे. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी कारखाना प्रतिनिधींना प्रशिक्षण देणे हास्यास्पद आहे. पथकाला काटामारी शोधण्याचे ज्ञान नाही. त्यामुळे काटामारीवाले मोकाट आहेत. पथकात आयटी इंजिनिअर हवा, अशी मागणी होती. त्यामुळे प्रत्येक ऊस उत्पादकांनी खासगी कारखान्यांवर वजन करूनच वाहन कारखान्याच्या वजनकाट्यास पाठवावे. मात्र, हे प्रशिक्षण लवकर आयोजित केले जाण्याची गरज आहे.

















