कोल्हापूर : भोगावती साखर कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू

कोल्हापूर : परिते येथील भोगावती साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांचे आगामी आठवडाभरात राजीनामे होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. दीड वर्षापूर्वी कारखान्याच्या झालेल्या निवडणुकीत आमदार पी. एन. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, माजी आमदार संपतराव पवार आदींच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सत्ता राखली होती. यानंतर काँग्रेसचे शिवाजीराव पाटील अध्यक्ष तर राजेंद्र कवडे यांना उपाध्यक्षपदाची संधी मिळाली. आता अध्यक्ष व उपाध्यक्ष बदलाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे धीरज डोंगळे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

याबाबत कारखान्याचे संचालक केरबा पाटील यांनी सांगितले की, अध्यक्ष बदल करायचा की नाही हे सर्वस्वी काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर अवलंबून आहे; पण शेकापला पहिल्यावेळी उपाध्यक्षपद मिळावे ही आमची मागणी होती. यावेळी ते मिळेल अशी अपेक्षा आहे. कारखान्याचे संचालक धीरज डोंगळे यांनी सांगितले की, ‘भोगावती’ची सत्ता आली तेव्हा अध्यक्षपदावर दावा केला होता पण आमदार पी. एन. पाटील यांनी समजूत काढून मला थांबवले होते. विधानसभा निवडणुकीनंतर हे पद देण्याचा ‘शब्द’ दिला होता. त्यामुळे हे पद मला मिळेल अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here