कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यात यंदाचा ऊस गळीत हंगाम अपेक्षेपेक्षा लवकर संपण्याच्या मार्गावर आहे. उसाच्या उत्पादनात झालेली घट, वाढलेला लागवड खर्च आणि मजुरांची टंचाई याचा थेट परिणाम गळीत हंगामावर झाला आहे. कारखान्यांना नियोजित कालावधीपूर्वीच गळीत थांबवावे लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.काही भागांत उसाची उंची, वजन कमी राहिले असून सरासरी उताराही घटला आहे. याचा परिणाम गळीत हंगामावर झाला असून, फेब्रुवारीअखेर हंगाम संपण्याची चिन्हे दिसत आहेत.
गळीत हंगामादरम्यान मजुरांची कमतरता ही मोठी अडचण ठरली आहे. तोडणी व वाहतुकीसाठी आवश्यक मजूर उपलब्ध न झाल्याने अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतातच उभा राहिला. परिणामी, गळीत वेळेत पूर्ण न झाल्याने साखर कारखान्यांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम झाला आहे. काही ठिकाणी तोडणीचे दर वाढल्याने शेतकऱ्यांच्या नफ्यात घट झाली आहे. पुढील वर्षी उत्पादन वाढविण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने लागवड, पाण्याचा वापर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन कारखाना व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे.

















