कोल्हापूर : यंदा उसाला ३७५१ रुपये पहिली उचल द्यावी – स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

कोल्हापूर : साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील तुटलेल्या उसाला प्रतिटन २०० रुपये दुसरा हप्ता व चालू गळीत हंगामातील पहिली उचल विनाकपात ३,७५१ रुपये देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सर्व कारखान्यांकडे करण्यात आली. संघटनेच्यावतीने सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त, गुरुदत्त, पंचगंगा, शाहू यांसह इतर कारखान्यांना निवेदन देण्यात आले. गेल्या वर्षभरात साखर व उपपदार्थांना चांगला दर मिळाला आहे. वर्षभरात साखरेची सरासरी काढल्यास ३,८०० रुपये क्विंटलने विक्री झालेली आहे. इथेनॉल, बगॅस, मोलॅसिस, प्रेसमड, अल्कोहोल यासह उपपदार्थांनाही चांगला दर मिळाला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना सहजपणे दर देणे शक्य असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

याबाबत स्वाभिमानी संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या चार ते पाच वर्षात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३,००० ते ३,१०० पर्यंत दर मिळाला आहे. मात्र, उत्पादन खर्च वाढल्याने गेल्या ५ वर्षांत केंद्राने वाढविलेल्या एफआरपीचा कोणताच लाभ शेतकऱ्यांना झालेला नाही. कारखान्यांकडे साखर व उपपदार्थ विक्रीतून आलेल्या पैशांमधून प्रक्रिया खर्च, तोडणी वाहतूक व व्याजाची रक्कम वजा जाता पैसे शिल्लक राहिले आहेत. त्यातून प्रतिटन २०० रुपयांचा दुसरा हप्ता द्यावा. चालू हंगामामध्ये ३, ७५१ रुपये दर द्यावा. तसेच २५ किलोमीटरचीच तोडणी वाहतूक कारखान्यांनी कपात करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here