कोल्हापूर : जमीन विस्ताराची मर्यादा संपली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून उसाचे एकरी उत्पादन वाढवायलाच हवे, यासाठी ‘एनसीडीसी’चे कर्ज मिळवून देण्याची जबाबदारी आमची आहे. उत्पादन वाढविले तरच साखर कारखानदारी फायद्यात येईल, शिवाय सभासदाभिमुख कारखाना चालवायला हवा. भोगावतीचा येणारा हा ऊस गळीत हंगाम सर्वांनी मिळून यशस्वी करूया, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या ६८ व्या ऊस गळीत हंगाम प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते ऊस गळीत हंगामाचा प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी. पाटील होते. संचालिका सीमा मास्तराव जाधव व मारुतराव बब्रुवान जाधव यांच्या हस्ते ऊस गव्हाणी पूजन झाले. मुश्रीफ म्हणाले, साखर कारखानदारी अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून संचालक मंडळाने आणि कामगारांनी धोरण ठरवावे लागेल.शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, तरच त्याला ऊर्जितावस्था येईल.
कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांनी “माझी भोगावती, माझा ऊस भोगावतीला” हे ब्रीदवाक्य सर्व ऊस उत्पादकांनी आपआपल्या मनात ठेवून सर्व सभासदांनी सर्व ऊस भोगावतीला पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन केले. उसाची पहिली उचल ३४०० रुपये जाहीर करतो. उच्चांकी ऊस गाळप करायचा आहे, यासाठी सर्वांचे सहकार्य हवे असे स्पष्ट केले.
कार्यकारी संचालक सागर पाटील यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, क्रांतिसिंह पवार-पाटील, गोकुळचे संचालक अरुण डोंगळे, बाळासाहेब खाडे, पी. डी. धुंदरे, जनता दलाचे वसंतराव पाटील, धैर्यशील पाटील, संजयसिंह पाटील, अध्यक्ष दिगंबर मेडसिंगे, उपाध्यक्ष मोहन पाटील, जनरल मॅनेजर संजय पाटील आदी उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी आर. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी आभार मानले.












