कोल्हापूर : राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त शाहू साखर कारखान्यात विविध उपक्रम

कोल्हापूर: सुरक्षितता केवळ सुरक्षा सप्ताहापुरती मर्यादित न ठेवता ती दैनंदिन कार्यपद्धतीचा अविभाज्य भाग बनविली पाहिजे. सुरक्षिततेचे नियम पाळले नाहीत, तर अपघात घडून कारखान्याचे, तसेच संबंधित कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने सुरक्षिततेचे नियम कायमस्वरूपी पाळावेत, असे आवाहन येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी केले. कारखान्यात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचा प्रारंभ कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजपूजन व सुरक्षा ध्वजवंदन करून उत्साहात झाला. यावेळी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

सुरक्षा सप्ताहानिमित्त कारखान्यात आठवडाभर विविध जनजागृतीपर उपक्रम, स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कारखाना परिसरात सुरक्षिततेबाबत जनजागृतीपर बॅनर्स व पोस्टर्स लावून व्यापक जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमावेळी एच. आर. मॅनेजर बाजीराव पाटील यांनी स्वागत केले. एस. के. पाटील यांनी सुरक्षा शपथ वाचन केले. सेफ्टी ऑफिसर उत्तम डोंगळे यांनी सुरक्षिततेसंदर्भातील उपाययोजना व खबरदारी याबाबत माहिती दिली. उपस्थित कर्मचाऱ्यांना सेफ्टी बॅचचे वितरण झाले. सिक्युरिटी ऑफिसर शहाजी पोवार यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here