कोल्हापूर : ऊसदरप्रश्नी आंदोलन आजपासून तीव्र करण्याचा विविध शेतकरी संघटनांचा इशारा

कोल्हापूर : ऊसदरप्रश्नी मागण्या मान्य झाल्या नाही, तर सोमवारपासून (दि. १०) आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा विविध संघटनांनी दिला आहे. प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयासमोर ६ नोव्हेंबरपासून बेमूदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. रविवारी शासकीय सुट्टी असूनही आंदोलन सुरूच होते. दरम्यान, मागण्या मान्य करा अन्यथा उद्यापासून आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा संघटनांनी रविवारी दिला. कायदा बनविणाऱ्यांनीच कायदा पायदळी तुडविला आहे. मागील हंगामातील आरएसपीनुसार होणारा हिशेब देऊनच कारखाने सुरू करण्याचा कायदा आहे. शेतकऱ्यांनी बाहेरून उसाचे वजन करून आणले, तरी मान्य करण्याचा नियम आहे, एफआरपी कायद्यातून कारखानदारांनी सुटका करून घेतली.

संचालक मंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरदूत काढून टाकली. खरी लूट वजनातून होत असल्यामुळे संगणक व प्रिंटरच्या माध्यमातून वजन चोरी केली जाते. त्याला आळा बसावा आदींसह अन्य मागण्यांसाठी ६ नोव्हेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे.’आप’चे राज्य संघटक संदीप देसाई म्हणाले, हिशेब न देणाऱ्या कारखानदारांवर तत्काळ ठोस कारवाई करावी अन्यथा याचा उद्रेक मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय राहणार नाही. आंदोलनात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी शिवाजी माने, मुकुंद पाटील, प्रणव पोफळे, राजू सूर्यवंशी, वैभव कांबळे, सदाशिव कुलकर्णी, यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक संजय वाघमोडे, रमेश गायकवाड आदींसह सर्व संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here