कोल्हापूर : गवसे (ता. आजरा) येथील वसंतराव देसाई साखर कारखान्याचा दहा हजार व पंधरा हजार रुपये शेअर्सधारकांना साखर वाटप करण्याचा घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. सर्व सभासदांना सरसकट साखर देण्याची मागणी संस्थापक-संचालक व माजी अध्यक्ष विष्णुपंत केसरकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे. पत्रकात म्हटले आहे की, कारखाना उभारणीत मोलाचे सहकार्य असणाऱ्या व तीन हजार रुपयांच्या शेअर्सधारकांच्या दृष्टीने हा अन्यायकारक आहे. या निर्णयाबाबत फेरविचार करून सर्वांना सरसकट साखर वाटप करावे. आपण कारखान्याचे संस्थापक संचालक आहोत. त्यामुळे कारखाना स्थापना कालावधीतील सभासद आपल्याकडे साखर वितरणाबाबत चौकशी करू लागले आहेत.
पत्रकात म्हटले आहे कि, वास्तविक या सभासदांना प्राधान्याने साखर मिळणे आवश्यक आहे. असे असतानाही केवळ अपुऱ्या सभासद वर्गणीचे कारण पुढे करून अशा कारखाना उभारणी कालावधीत मदत केलेल्या सभासदांना साखरेपासून वंचित ठेवणे निश्चितच अन्यायकारक आहे. मुळातच साखर वितरणात अनियमितता आहे. कारखान्याचे भाग भांडवल वाढवण्याच्या दृष्टीने सभासद वर्गणी भरणे आवश्यक असले तरीही सभासदांनी केवळ साखरेसाठी जादाच सभासद रकमा भरल्यास भविष्यात साखर मिळेल याची हमी देता येत नाही. दहा व पंधरा हजार रुपयांचे शेअर्स असणारे केवळ १५ ते २० टक्के इतके सभासद आहेत. इतर ऊस उत्पादक सभासदांना आजतागायत कोणताच लाभ कारखान्याच्या माध्यमातून झालेला नाही. ही नाराजी वाढली तर भविष्यात कारखान्याला गळितासाठी ऊस मिळणे अडचणीचे होऊन बसेल. किमान सवलतीच्या दरातील साखर तरी त्यांना मिळावी अशी आपली भूमिका असल्याचेही केसरकर यांनी स्पष्ट केले.


















