कोल्हापूर – वारणा साखर कारखाना ५०० एकरांवर वापरणार ‘एआय’ तंत्रज्ञान : आमदार डॉ. विनय कोरे

कोल्हापूर : तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्यातर्फे कार्यक्षेत्रातील पाच गटांत ५०० एकर उसाच्या क्षेत्रावर एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञान वापरून ऊस शेतीचा प्रयोग साकारणार आहे. त्यासाठीचा खर्च वारणा काररखाना करणार असल्याची घोषणा आमदार विनय कोरे यांनी केली.वारणा कारखाना, इलाईट कृषी सेवा संस्था व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा व आधुनिक ऊस शेती व शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापर, या विषयावर डॉ. कोरे बोलत होते. ‘व्हीएसआय’चे पीक उत्पादक व संरक्षण विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. ए. डी. कडलग, बारामती कृषी विज्ञान केंद्राचे तुषार जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. कोरे म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांनी उसाच्या नव्या क्रांतीकडे वळावे. वारणा कारखान्याचे सहकार्य राहील. डॉ. ए. डी. कडलग म्हणाले, शेतात कीड व रोगांचा वाढलेला प्रादुर्भाव, खते व कीटकनाशकांचा अनावश्यक वापर, हवामानबदल, हेक्टरी उत्पादन कमी अशा कारणांनी शेती क्षेत्रावर परिणाम झाला आहे. ऊस उत्पादकता, साखर उतारा, तोडणी नियोजन याबाबत अचूक माहिती देणारे तंत्रज्ञान समजून घ्यावे. शाश्वत ऊस उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचे महत्त्व समजून घ्यावे.

तुषार जाधव म्हणाले, “उपग्रह प्रणाली, स्वयंचलित हवामान केंद्र, फवारणी, निरीक्षण ड्रोन, उसाचे नियोजन यासह अन्य तंत्रज्ञान विकसित केले तर जमिनीची सुपीकता अबाधित राहील. शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांनीही नवे तंत्रज्ञान विकसित करावे.” ‘इलाईट’च्या नवीन ड्रोनचे उद्घाटन श्री. कोरे यांच्या हस्ते झाले. ते सवलतीत सभासद, शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. ऊसविकास अधिकारी सुभाष करडे यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, कार्यकारी संचालक एस. आर. भगत, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, ‘इलाईट’चे अध्यक्ष विठ्ठल पाटील, संचालक सुभाष पाटील, श्रीनिवास डोईजड, मुख्य शेती अधिकारी प्रमोद पाटील यांच्यासह वारणा उद्योग समूहातील पदाधिकारी उपस्थित होते. प्रा. एन. आर. चोपडे यांनी सूत्रसंचालन केले. विठ्ठल पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here